शिर्डी: साईबाबांची जन्मभुमी पाथरी असल्याने तेथे विकास निधी देण्यावरुन शिर्डीकर विरुध्द पाथरीकर असा वाद देशभरात गाजला. त्यावर नंतर पडदा पडला तरी पुन्हा साईबाबांच्या जन्मस्थळावरून नव्या वादाला तोंड फुटत आहे. एका खाजगी वाहीनीवर सुरु असलेल्या मालिकेत साईबाबांचे खोटे जन्मस्थळ, नाव, गाव वापरण्यात येत आहे. त्यामुळे साईभक्तांचा संभ्रम होत आहे. या प्रकारामुळे साई भक्तांच्या भावनेला आणि श्रद्धेला तडा जातोय.
मालिकेचे प्रसारण थांबवण्याची मागणी
साईबाबांनी स्वत: कधिही त्यांच्या जात तसेच धर्माचा उल्लेख केला नाही. साईबाबां बरोबर असलेल्या तत्कालीन भक्तांनीही त्यावेळी अनेकदा बाबांकडुन याबाबत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मालिकेत साईबाबांविषयी प्रसारित होणारी माहिती खोटी आहे. साईबाबा संस्थानच्या अधिकृत श्री साई चरित्र ग्रंथामध्ये जन्मा विषयी उल्लेख नाही. त्यामुळे या मालिकेचे प्रसारित होणारे पुढील भाग त्वरित थांबवावेत अशी मागणी करत संबंधित वाहिनी विरोधात शिर्डीतील साईभक्त, ग्रामस्थ सर्जेराव कोते आणि प्रमोद गोंदकर यांनी राहाता न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
साईभक्तांच्या श्रद्धेला मालिकेमुळे तडा
या याचिकेवर आज न्यायालयात पहिली सुनावणी झाली. साईबाबांचे जन्मस्थळ, त्यांच्या वडिलांचे नाव, गाव, कुळ, जात, धर्म हे कुणालाही माहित नाही. तरीही या मालिकेत त्यांचे जन्मस्थळ नाव वापरले जात आहे. त्याचप्रमाणे बाबा शिर्डीत प्रथम आल्यानंतर खंडोबा मंदिरासमोर पुजारी म्हाळसापती यांनी 'आओ साई' म्हटल्यानंतर बाबांचे नाव साई पडले. मात्र या मालिकेत त्यांच्या लहानपणापासूनच साई नाव देण्यात आले आहे. या सर्व काल्पनिक आणी खोट्या माहिती मुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यांच्या विश्वास, श्रद्धेला तडा जात आहे. श्री साई चरित्र ग्रंथ हा श्री साईबाबा हयात असताना तत्कालीन साईभक्तांनी त्यावेळी दिलेल्या माहिती व अनुभवावरून दाखले देत लिहिला गेला आहे. मात्र या साईचरित्र ग्रंथातून माहिती घेण्याऐवजी इतर ११ वेगवेगळ्या पुस्तकातून माहिती घेऊन ही मालिका बनवली जात आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.