शिर्डी (अहमदनगर) Sai temple Kalash Shirdi :साई मंदिर मुळात नागपूरच्या बुटी सरकारांचा वाडा होता. त्या वाड्याला नंतर मंदिरात रुपांतरीत करत त्यात श्रीकृष्ण आणि रामाच्या मूर्ती बसवण्यात येणार होत्या. मात्र, साईबाबांनीच मला या मंदिरात विश्रांत घ्यावयाची असल्याचं सांगितल्यानंतर साईंच्या महानिर्वाणानंतर त्यांचा देह ठेवत समाधिस्थ करण्यात आला आणि बुटीवाडा साईमंदिर झालं. ते साल होतं 1918. याच साई मंदिरावर 1952 साली सभा मंडपाचं काम पूर्ण झालं. त्यानंतर कलश रोहण करायचं होतं. एरवी मंदिराच्या कलशारोहणाचा अधिकार हा ब्रह्मचारी आणि संन्यास आश्रम स्वीकारलेल्या व्यक्तीस असतो. मात्र, साईबाबांच्या जशा लिला अनोख्या होत्या, तशीच कलशारोहणाची कहानीही वेगळी आहे.
कलशारोहणाचा स्मृतिदिन :अहमदनगर जिल्ह्यातील पूर्णवादाचार्य डॉ. रामचंद्र महाराज जे प्रापंचिक व्यक्ती होते. त्यांच्या हस्ते 29 सप्टेंबर 1952 साली साईमंदिरावर सुवर्ण कलशारोहण पार पडले होते. या सोहळ्यास आज 71 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून 29 सप्टेंबरला शिर्डीत सुवर्ण कलशारोहण स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी शिर्डी ग्रामस्थ आणि पारनेरकर गुरू सेवा मंडळाच्या वतीने सुवर्ण कलशारोहणाचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.