शिर्डी(अहमदनगर)- भाविकांच्या दातृत्वातून शिर्डीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कोविड तपासणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील एक दोन दिवसांत ऑक्सिजन प्रकल्पाची चाचणी होईल अशी माहिती साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली.
हवेपासून ऑक्सिजन तयार करण्यात येणार
मसुरी येथील प्रशिक्षणाहुन परतताच बगाटे यांनी या दोन्हीही प्रकल्पांना भेटी देवून कामांना गती देण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पात हवेपासून ऑक्सिजन तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंबानींच्या रिलायन्स उद्योगाने जवळपास पावणेदोन कोटीची यंत्र सामग्री संस्थानला दिली आहे. या प्रकल्पासाठी विशिष्ठ प्रकारचे शेड उभारण्याकरता चेन्नई येथील साईभक्त के.व्ही. रमणी यांनी जवळपास पंचेचाळीस लाखांची मदत केली आहे.
रोज अडीचशे ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती
साईनाथ रुग्णालयालगत यासाठी दीड हजार चौरस फुटांचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये बाहेरील तपमानाचा कोणताही फरक पडणार नाही. या प्रकल्पात रोज अडीचशे सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होईल, तीनशे बेडसाठी चोवीस तास हा ऑक्सिजन पुरेल. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अवघ्या दोन आठवड्यात सिमेंट फौंडेशनसह शेड तयार करून ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
सीईओ बगाटे मसुरीला असतांनाही या कामांवर झुम मिटींगच्या माध्यमातून लक्ष ठेवून सुचना देत होते. त्यांचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे प्रमुख डॉक्टरांसह कामावर तळ ठोकून होते.
रिलायन्स उद्योग एक कोटी देणार-
कोविड तपासण्याचे अहवाल उशीरा मिळत असल्याने साईसंस्थान स्वत:च कोविडची आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा उभारत आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठीही अंबानींचा रिलायन्स उद्योग जवळपास एक कोटी रूपये देण्याच्या विचारात आहे. प्रयोगशाळेची उभारणी युद्धपातळीवर सुरू असून येत्या आठवडाभरात या प्रयोगशाळेत तपासण्या सुरू होवू शकतील. रोज एक हजार तपासण्या होतील व बारा तासांच्या आत अहवाल मिळू शकेल असे बगाटे यांनी सांगितले.
प्रशिक्षणावरून परतताच सीईओ बगाटे यांनी डॉक्टरांची बैठक घेवून कोविड रूग्णालयांच्या कामाचा आढावा घेतला. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी कामांचे ऑडीट करण्यात येईल, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारयांच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील. संस्थान सेवेतील डॉक्टरांनी बाहेर खासगी प्रॅक्टीस करू नये अशा सुचना बगाटे यांनी दिल्या.