शिर्डी :साई बाबांच्या मंदिरात हार, फुले, गुच्छ व प्रसाद सुरू करण्यास साई संस्थानच्या तदर्थ समितीने अनुकूलता दर्शविली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या मान्यतेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांकडून होणार फुलांची खरेदी :जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संस्थान कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेमार्फत शेतकऱ्यांकडून फुलांची खरेदी करणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांना ही फुले रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे साई संस्थानचे मुख्य अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले. 12 एप्रिलला जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी तथा संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य सिद्धाराम सालीमठ व साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या समितीने साई मंदिरात हार, फूल, प्रसाद अर्पण करण्यास मान्यता दिली आहे.
बंदी उठवण्यासाठी आंदोलन :कोविडमुळे 17 मार्च 2020 पासून मंदिरात हार, फुले, गुच्छ व प्रसाद अर्पण करण्यास बंदी घालण्यात आली होती. कोविडनंतरही बंदी कायम राहिली. ही बंदी उठवण्यासाठी 25 ऑगस्ट 2022 रोजी आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. भाविकांची लूट टाळण्याच्या दृष्टीने फूल विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सूचवण्यासाठी महसूल मंत्री विखे यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन आढावा बैठक घेऊन समिती समोर अहवाल ठेवण्याचे निर्देशही संस्थान प्रशासनाला देण्यात आले आहेत.
फूल मार्केटवर गावकऱ्यांची उपजीविका :शिर्डी येथील फूल मार्केटमध्ये राहाता तालुक्यातील दहा, कोपरगाव तालुक्यातील तीन, संगमनेर तालुक्यातील दोन व श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातून जवळपास सहाशे शेतकरी गुलाब, झेंडू, सब्जा, शेवंती व गुलछडी यासारखी फुले विक्रीसाठी आणतात. या तालुक्यातील 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती आहे. त्यावर तेथील शेतकरी, मजूर, व्यापारी यांची उपजीविका यावर अवलंबून आहे. शिर्डी शहरात जवळपास 251 फूल विक्रेते व 13 फळ विक्रेते दुकानदार आहेत.
हेही वाचा - Akshaya Tritiya 2023: श्री सिद्धिविनायक मंदिरात हापूस आंब्याची आरास, अक्षय्य तृतीयेनिमित्त सजला गाभारा