अहमदनगर :साईभक्त साईचरणी दान म्हणून शेतमालापासुन हिरे, माणिक, मोती अर्पण करतात. साई भक्तांच्या दानातुन साई प्रसादालयात मोफत भोजन अर्थातच साईचा प्रसाद दिला जातो. सध्या सर्वत्र आमरस पुरीचा बेत आखला जात आहे. साईभक्तांनाही आमरस पुरीचे जेवन द्यावे, या हेतुने साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण सरगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेत आहे.
आंबे साई चरणी दान :शिर्डीत प्रत्येक भक्त साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्याकुवती प्रमाणे दान करत असतो. सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यापैकी काही धान्य दान करतात. तर, काही शेतकरी भाजीपाला दान करतात. या व्यतिरीक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे, मोतीही दान करतात. मात्र आज साईभक्त असलेले पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील दिपक सरगळ हे आंबा बागदार शेतकरी आहे. त्यांनी साईचरणी दोन लाख रुपये किमतीचे पंचवीस किलो केशर आंबे अर्पण केले आहेत. साईभक्त दिपक हे सन 2019 पासुन आपल्या बागेतील आंबे साई चरणी दान करतात.