शिर्डी -कोविडच्या महामारीत अंत्यविधीचे तसेच शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांचे गेले तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत कामगारांचे पगार देता येत नसतील तर राजीनामा द्या अशी मागणी केली आहे.
शिर्डी; स्वच्छता कामगारांच्या पगारावरून सत्ताधारी व महाविकास आघाडी आमनेसामने शिवसेना नेते कमलाकर कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, काँग्रेसचे सचिन चौगुले, संजय शिंदे, विजय जगताप, सचिन कोते, उमेश शेजवळ, सुनील गोंदकर, दत्तू त्रिभुवन, अमृत गायके, अमोल गायके, सुरेश आरणे आदींच्या शिष्टमंडळाने आज नगरपंचायत कार्यालयात येवून या कामगारांच्या रखडलेल्या पगारासंदर्भात नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना विचारणा केली.
यावेळी सत्ताधारी गटाच्या बाजुने भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक सुजित गोंदकर, अशोक गायके उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तत्काळ द्यावे, त्यांना एक महिन्याचा किराणा द्यावा, अंत्यविधीचे काम करणाऱ्या कामगारांचा कोविड विमा काढा व पगार दुप्पट करा अशी मागणी कमलाकर कोते यांनी केली.
यावर बोलताना नगराध्यक्ष गोंदकर यांनी बी.व्ही.जी. कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, एक महिन्याचा पगार नगरपंचायत आज करणार असून उर्वरीत दोन महिन्यांचा पगार कपंनी करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नगरपंचायतच्या अन्य फंडातील निधीतून पगार करावे अशी मागणी आघाडी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी पैसे असले तरी ते इतर कामांवर खर्च करण्यास शासनाची मान्यता लागते. महाविकास आघाडीचे सरकार आहे. अन्य फंडातील रक्कम पगारावर खर्च करण्यास मुख्यमंत्र्याकडून मान्यता आणा, आम्ही कामगारांचे लगेच पगार करू असे सांगितले. यावर शिवसेनेचे कमलाकर कोते यांनी प्रत्येक वेळी आमचे सरकार असल्याचे सांगून परवानगी आणण्यास सांगितले जाते. सत्ताधाऱ्यांनी राजीनामे देवून प्रशासक नेमावा, आम्ही एका दिवसात पगार करू असे आव्हान सत्ताधारी गटाला दिले.
नगरपंचायत कोट्यवधी रूपयांचे नवीन कामांचे भूमीपुजन करते, कायम कर्मचाऱ्यांचे वेळच्यावेळी पगार करते, स्वच्छता कामगारांच्या जीवावर करोडो रूपयांची बक्षीसे मिळवते, मग या कामगारांचे पगार का रखडवते असा सवाल काँग्रेसचे सचिन चौघुले यांनी केला.