अहमदनगर: -कर्जत मध्ये मागच्या पंचवार्षिकला भाजपचा आणि पारनेर इथे शिवसेनेचा बोलबाला होता. मात्र 2019 ला कर्जतला राम शिंदेंना हरवत रोहित पवार आणि पारनेर मध्ये शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना पराजित करत निलेश लंके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले आणि या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसू लागले. अकोलेत आ.वैभव पिचड राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये गेले, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि अकोले तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभे राहिला.
नगरपंचायतीसाठी कर्जत-पारनेर मध्ये रोहित पवार, निलेश लंकेंचे शक्ती प्रदर्शन
शिर्डीत निवडणुकीवर बहिष्कार
नगर दक्षिण भागात कर्जत आणि पारनेर तर उत्तरेतील अकोले, शिर्डी नगरपंचायतची निवडणूक होत आहे. शिर्डी नगर पंचायतींचे नगर परिषदेत रूपांतर करावे म्हणून या निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. तर कर्जत आणि पारनेर, अकोले इथे मात्र सर्वपक्षीय कार्यकर्ते हे निवडणुकीत उतरले आहेत.
राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन तर विरोधी गटात शांतता
कर्जत आणि पारनेर इथे पवार-लंके या राष्ट्रवादी आमदार द्वयिंनी मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी जागा वगळून ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे 17 ऐवजी 4 ओबीसी जागा वगळून 13 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.
मतदारसंघावरील भाजपची सद्दी संपवली
सलग दोन वेळा आमदार आणि दुसऱ्या टर्मला कॅबिनेट आणि पालकमंत्री राहिलेले कर्जत-जमखेडचे भाजप नेते राम शिंदेंना राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी धोबीपछाड देत लक्षवेधी विजय मिळवला आणि पंचवीस-तीस वर्षे भाजपची मतदारसंघावर असलेली सद्दी संपवली. त्यानंतर कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजपचे अनेक मोहरे आणि राम शिंदेंचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत ओढत मतदारसंघ राष्ट्रवादीमय केला. हीच परस्थिती पारनेरचे आमदार निलेश यांनी आपल्या मतदारसंघात केली आणि तीन वेळेस शिवसेना आमदार आणि शेवटच्या टर्मला विधानसभा उपाध्यक्ष असलेले विजय औटींनी पराभवाची धूळ चारत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. या परस्थितीत तालुका मुख्यालय असलेल्या शहरात नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने होणारी ही निवडणूक आमदार रोहित-निलेश यांच्यासाठी वर्चस्वाची तर शिंदे-औटींसाठी अस्तित्व दाखवण्याची परीक्षा आहे.
राष्ट्रवादी विकासाच्या मुद्यावर रिंगणात
शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने शिंदे-औटी दिसून आले नाहीत, मात्र रोहित पवार आणि लंके यांनी मिरवणुका काढत आपली ताकत दाखवली. यावेळी रोहित आणि निलेश यांनी राष्ट्रवादी पक्ष विकासाचे राजकारण करत आहे. आम्हाला काम न करता केवळ विरोधकांवर आरोप करायला वेळ नाही. मतदारसंघात कोरोना काळातही केलेल्या विकासकामांची यादी त्यांनी यावेळी मांडली. पारनेर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे. निधी मंजूर झाला आहे. काही दिवसांत शहरात पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतल्याचे लंके यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादी-सेने पुढे काँग्रेस निष्प्रभ
कर्जत मध्ये भाजप तर पारनेर मध्ये शिवसेना हे पक्ष राष्ट्रवादी उमेदवारांसमोर प्रमुख विरोधक असणार आहेत. या लढतीत काँग्रेस आणि इतर पक्ष काहीसे दुर्लक्षित आहेत. कर्जत मध्ये मागील पंचायतीत चार नगरसेवक निवडणूक आलेले होते. आता काँग्रेस रिंगणात असली तरी पूर्वीची ताकत पक्षात आहे का यावर सांशकता व्यक्त होत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतल्यास कर्जत मध्ये काँग्रेसला काही आधार मिळतो का याची उत्सुकता आहे.
हेही वाचा :Shirdi Nagar Panchayat : शिर्डीकरांचा विजय झाला - राधाकृष्ण विखे पाटील