अहमदनगर - शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अहमदनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटलांचा मुलगा सुजय यांची भेट घेतली. या भेटीच्या कारणावर तर्क-वितर्क लढवले जात होते. यावर स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, की दोन युवकांनी भेटण्यात गैर काय आहे. आम्ही सहज भेटलो, भेटून साखरेच्या भावावर चर्चा केली, असे पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, की अहमदनगर येथे माझ्या आजोबाने काम केले आहे. त्यामुळे या जागेविषयी माझ्या मनात जिव्हाळा आहे. त्या ओढीने तिथे गेलो. तेव्हा सुजय यांची भेट झाली. यात राजकीय हेतू नव्हता. आम्ही भेटून साखरेच्या भावावर चर्चा केली, असे पवार म्हणाले.
यावेळी रोहीत पवार यांनी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की या भागाचा विकास अजूनही झाला नाही. येथील युवकास रोजगार नाही. पाणी प्रश्न बिकट आहे. औद्योगिक वसाहत, वैद्यकीय सेवा यांचाही प्रश्न आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण राजकीय सत्तेतून प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
कर्जत - जामखेड मतदारसंघातून रोहीत पवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा होत होती. त्यावर पत्रकारांनी रोहीत यांना प्रश्न विचारला. पण, त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, डॉ. कैलास हजारे, जुबेर सय्यद, अमित जाधव, अमजद पठाण आदी उपस्थित होते.