महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेवासा विधानसभा मतदारसंघ : तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? - माजी आमदार शंकरराव गडाख

राजकीयदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेल्या या तालुक्यात अलीकडे भाजप - सेना युतीचे बळ वाढल्याचे दिसत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसारखी यावेळही या मतदारसंघातील लढत ही अतितटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी येथून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव लंघे यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नेवासा विधानसभा मतदारसंघ

By

Published : Sep 16, 2019, 1:35 PM IST

Updated : Sep 16, 2019, 7:55 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नेवासा नगरी ही प्रवरा नदीच्या काठावर वसली आहे. राजकीयदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेल्या या तालुक्यात अलीकडे भाजप - सेना युतीचे बळ वाढल्याचे दिसत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसारखी यावेळही या मतदारसंघातील लढत ही अतितटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी येथून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव लंघे यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.


मारुतराव घुले, यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे. गोदावरी, प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचा संगमही याच तालुक्यात होतो. ज्याला प्रवरा संगम म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्वर मंदिर, मोहिनीराज मंदिर, देवगड देवस्थान तसेच शनिदेवाचं स्वयंभू स्थान असलेलं शनिशिंगणापूर अशी महत्वाची धार्मिक स्थळे या मतदारसंघात आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे. मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ यशवंतराव गडाख यांनीच रोवली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो की स्थानिक संस्था यावर गडाखांचं प्राबल्य दिसून येते. शनि शिंगणापूर देवस्थानावरही विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून गडाखांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघ

हा तालुका कायम विद्रोही विचारांचा आणि परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेवगाव-नेवासा असा संयुक्त मतदारसंघ असतानासुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींना निवडून दिले नाही. तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करुन वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला २ वेळा आमदार केले. त्यानंतर लंघे यांचा पराभव करुन 10 वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले. त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले यांचा पराभव करुन अपक्ष तुकाराम गडाख निवडणून आले. 1995 साली तुकाराम गडाखांचा पराभव करुन पांडुरंग अभंग हे आमदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे २ वेळा आमदार राहिले. 2009 साली नेवासा हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आणि यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख मतदारसंघाचे प्रतिनीधी झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाखांवर ४ हजार ६५२ मतांनी निसटता विजय मिळवला.

राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने शंकराव गडाख यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीनंतर सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी शेतकरी क्रांतीकारी पक्षाची स्थापना केली. त्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव लंघे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीही विजयाची समीकरणे बिघडवू शकते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे संजय सुखदान यांनी चांगली मते मिळवली होती. संजय सुखदान नेवासा येथील असल्याने त्यांचंही नाव चर्चेत आहे.


नेवासा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न -
१) गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेचे रखडलेलं काम
२) रस्ते आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
३) करोडो रुपयांचा निधी अद्यापही खर्च केला नाही
४) धार्मिक पर्यटन विकासाला चालना


नेवासा विधानसभा 2014 मध्ये पडलेली मते
१) बाळासाहेब मुरकुटे ( भाजपा ) 84 हजार 361 विजयी
२) शंकरराव यशंवंतराव गडाख ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 78 हजार 565

Last Updated : Sep 16, 2019, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details