अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी मंगळवारी 14 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून, ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी आणखी 5 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तसेच 5 व्यक्तींना जिल्हा रुग्णालय येथे तर 2 व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा -COVID-19 LIVE : कोलकातामध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, देशातील रुग्णांची संख्या १४२ वर...
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याबद्दलही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आभार मानले. नागरिकांनी हे संकट दूर करण्यासाठी आणखी काही दिवस सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्या 14 जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटीव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिह्यातील शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदीर, शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्र्वर देवस्थान, श्री क्षेत्र देवगड यासह इतर देवस्थांनानी जिल्हा प्रशसनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. यामुळे बाहेर राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून येणारी नागरिकांची संख्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.