रामदास आठवले यांची प्रतिक्रिया अहमदनगर (शिर्डी) : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावायला पाहिजे होती. ठाकरेंनी फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावली असती आणि मला बाजूला उभे केले असते तर एवढे आमदार फुटले नसते, असा टोला यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे यांना लागवला. उद्धव ठाकरेंचा काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणे नाईलाज आहे. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून ठाकरे दूर चालले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी आठवले म्हणाले आहेत.
बीआरएसने काही फरक पडणार नाही :चंद्रशेखर राव यांचे बरेच बोर्ड महाराष्ट्रात दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नविन पक्ष आल्याने काही फरक पडणार नाही. बोर्ड लावले असले तरी, त्यांना फारशी मते मिळणार नाहीत. एखादा नवीन पक्ष आला की इकडचे तिकडचे लोक पक्षात जातात. बीआरएस पार्टी तेलंगणाची आहे. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार नाही असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
पुन्हा मोदीच पंतप्रधान :सतरा विरोधक एकत्र आले काय आणी शंभर आले काय? त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. जेव्हढे विरोधक जास्त एकत्र येतील तेवढी लोकप्रियता मोदींची वाढणार आहे. विरोधक एकट्या मोदीं विरोधात धडपडत करता आहेत. मोदी सर्वांना न्याय देण्याचे काम करता आहेत. विरोधकांची मोदी हटाव अशी भुमिका आहे. तर, आमची भुमिका मोदी विरोधक कटाव असल्याचे आठवले म्हणाले. आपल्या खास शैलीत आठवलेंची मोदी विरोधी गठबंधनावर टिका केलीय. 2024 ला मोदींच पंतप्रधान होतील. साधारण 350 जागा मिळतील असा दावाही आठवलें यांनी यावेळी केला.
दिव्यांगांना साहित्याचे वाटप :राहाता तालुक्यातील लोणी येथे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय प्राधिकरण मंत्रालय व सामाजिक न्याय विभागामार्फत मंजूर झालेल्या 1000 हून अधिक दिव्यांगांना साहित्याचे वाटप मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आदी उपस्थित होते.
दिव्यांगांना परिपूर्ण सुविधा : सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आता २१ श्रेणी निर्माण करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून दिव्यांगांना न्याय मिळवून देताना देशातील १ हजार ३१४ सरकारी भवन हे सुगम्य बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ३५ अंतरराष्ट्रीय विमानतळ, ७०९ रेल्वेस्टेशन, ६१४ वेबसाईट, १९ समाचार चॅनल तसेच ८ लाख शाळा यासर्व सुविधांनी परिपुर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याचे आठवले म्हणाले.
दिव्यांगाना कार्डचे वितरण :राज्यातही आमच्या विभागाने समाज घटकांच्या उन्नतीसाठी २ लाख ४४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आत्तापर्यंत राज्यातील ५ हजार ९९३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधीची उपलब्धता करुन दिली. यु.डी.आय.ए योजनेच्या माध्यमातून १७ लाख दिव्यांगाना कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती आठवले यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -Sameer Wankhede News: समीर वानखेडे-क्रांती रेडकर दोघांनी पहिल्यांदाच एकत्रित घेतले साईंचे दर्शन, 'हा' मागितला आशिर्वाद