अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी खडसे यांना पक्षात प्रवेश देत सत्तर हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्यातील मुख्य साक्षीदार फोडल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे भाजपचे नेते राम शिंदे यांनी म्हटले. खडसेंना केवळ राष्ट्रवादीत पश्चाताप मिळेल, असा दावा शिंदे यांनी केला आहे. खडसे यांच्याकडे सिंचन घोटाळ्यातील गाडीभर पुरावे होते. मात्र, जलसिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही, असेही माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
भाजप नेते राम शिंदे यांची आमदार रोहित पवार यांच्यावर टीका
साधारणत: वर्षभरापूर्वी विधानसभेचे निकाल लागले. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात भाजपचे मतदारसंघातील तत्कालीन विद्यमान आमदार, राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी पराभवाची धोबीपछाड दिली होती. या पराभवाला आज वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात काय काम केले, याचा उहापोह राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतला. बारामती पॅटर्न फेल गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. 'नवे पर्व, फेल सर्व' असे शिंदे यावेळी म्हणाले. वर्षभरात कामे झाली नाहीत. पूर्वीच्याच कामांचे फक्त नारळ फोडण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केल्याचा दावा शिंदे यांनी केला.