शिर्डी -शेतकरी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या नविन शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा यांनी महाराष्ट्रात जनप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील बोलकी गावात ही यात्रा पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते.
'आमच्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या'
ते पुढे म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना आमच्या शेतकरी आंदोलकांवर त्यांनी गोळ्या घातला. आज जे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. याच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राज्यातील बहुतांश बाजार समित्या आहे. मात्र हेच शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेला हमी भाव देत नाही.
'नवीन कृषी कायदे चांगले, पण..'
दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन म्हणजे दिल्लीत गाजलेल्या शाहीनबाग आंदोलनासारखे नवीन शाहीनबाग आंदोलन आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे चांगले आहेत, फक्त त्यात दोन-तीन सुधारणा करण्याची आमची मागणी आहे. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'शेतकरी आत्महत्येस आमदार-खासदार जबाबदार'
आज राज्यातील शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. यास जनतेने निवडून दिलेले आमदार-खासदार आणि सरकारची धोरणे जबाबदार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी ही महाराष्ट्रात जनप्रबोधन जनजागृती केली जात आहे. ही यात्रा 28 नोव्हेंबरला सुरू झाली असून 12 डिसेंबरपर्यंत असेल.