अहमदनगर - भाजपमध्ये औपचारिक प्रवेश बाकी असलेले राधाकृष्ण विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीने जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झालेल्या सभा, युतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत यामुळे झालेला विजय सुखावणारा असल्याची भावना राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
विजय सुखावणारा; तालुक्याची बूज राखता येत नाही, त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहू नये - राधाकृष्ण विखे - अहमदनगर
तालुक्याची बूज राखता येत नाही त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहू नये असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.
निवडणुकीच्या सुरुवातीपासून टीका करणारे बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता विखे यांनी, ज्यांना आपल्या तालुक्यात पक्षाची बूज राखता आली नाही, त्यांनी राज्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहू नये, असा टोला त्यांनी यावेळी हाणला. पक्षाकडूनच झालेल्या अवहेलनेबद्दल विखे यांनी दुःख व्यक्त केले. लवकरच सहकारी नेते-कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढचा निर्णय घोषित करू, मात्र कार्यकर्त्यांच्या मनाचा हिरमोड करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एक प्रकारे आता विखे यांचा भाजप प्रवेश लवकरच होणार हे निश्चित मानले जात आहे.