अहमदनगर - मात्तब्बर राजकीय व्यक्तींचा म्हणुन अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. तसा तो आपआपले गड मजबूत ठेवण्यासाठी होणाऱ्या राजकीय कुरापतींसाठीही प्रसिद्ध आहे. या निवडणुकीत विखेंनी भाजपचा रस्ता धरल्याने त्यांचे विरोधक बाळासाहेब थोरात यांनी विखे विरोधकांची एकत्र मोट बांधली आहे. मात्र, ही एकी खरेच टिकेल का? असा प्रश्न या राजकारणांच्या वक्तव्यातुन दिसुन येत आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात विखे घराणे विरुध्द इतर राजकीय घराणी अथवा नेते यांच्यात राजकीय कुरघोडीमुळे नेहमीच सुंदोपसुंदी राहिल्याचे बघावयास मिळाले आहे. विखेंचा संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेप राहिल्याने विखे विरोधकांची संख्या वाढत गेली आहे. या लोकसभा निवडणुकीतही सुजय विखेंनी भाजपत प्रवेश केल्याने आणि राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या प्रचारापासुन चार हात लांब राहिल्याने विखे-थोरात वाद बघावयास मिळत आहे. त्यात थोरातांनी विखे विरोधकांना एकत्र केले आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर तालुक्यातील आदिक, मुरकुटे आणि ससाणे यांनाही एकत्र आणण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, निवडणुकीत उत्तर नगर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे बाळासाहेब थोरात हे नेहमी पाठीमागे राहतील का? ही चर्चा सुरू असतानाच या चर्चेला श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंनी आपल्या भाषणातुन थोरातांनी निवडणुकीनंतर केवळ संगननेर एके संगमनेर करू नका, असे सांगत वाट मोकळी करुन दिली आहे.