अहमदनगर- लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे समर्थन करीत त्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे माझा भाजप प्रवेश हा आता मुद्दा राहिला नाही, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमध्ये केले आहे. तसेच मला मंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि ते जेव्हा सांगतील तेव्हा शपथ घेणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश उरला असताना आता त्यांना कोणते खाते मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे आवडते कृषी खाते त्यांना दिले जाणार की वाढीव एफएसआय प्रकरणात अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांचे गृहनिर्माण खाते त्यांना देणार यावर अंदाज बांधले जात आहेत. मात्र, यावर विखेंनी सावध भूमिका घेत हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे म्हटले आहे.