अहमदनगर - 'पब्जी गेम'च्या आहारी गेल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल नानासाहेब पवार (वय २७) असे त्याचे नाव आहे. राहुल हा पबजी गेमच्या आहारी गेला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
पबजी गेमच्या आहारी गेल्याने तरुण अभियंत्याची आत्महत्या
अहमदनगर जिल्ह्यामधील टाकळीभान येथील अभियंता राहुल पवार याने पबजी गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राहुल नानासाहेब पवार याने गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरात बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
आयटी अभियंता असलेला राहुल हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवासी होता. 'पब्जी गेमच्या' आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आयटी इंजिनियर असलेल्या राहुलचे गेल्याच फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. मात्र, नोकरी न करता पोल्ट्री व्यवसाय करण्याचे त्याने ठरवले होते. दरम्यान, राहुल हा पबजी गेमच्या आहारी गेला होता, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणने आहे. रात्रभर पबजी गेम खेळल्यानंतर त्याने पहाटेच्या सुमारास बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. 'पबजी गेमच्या' आहारी जाऊन आत्महत्या केल्याची ही काही पहिलीच घटना नाही, परंतु राहुल सारख्या उच्च शिक्षित मुलाने पबजी गेममुळे आत्महत्या केल्याने या गेमचे दुष्परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचा तो मुलगा होता.