अहमदनगर- झारखंडमधील मॉब लिंचिंगमध्ये तबरेज अंसारी या युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येचा निषेध म्हणून अहमदनगरमध्ये सर्व धर्मियांच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मूकमोर्चा काढण्यात आला.
मॉब लिंचिंगच्या विरोधात अहमदनगरमध्ये जनआक्रोश मूक मोर्चा या मोर्चात मुस्लिम समाजासह इतर धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी हिंदू-मुस्लिम-सिख-ईसाई, हम सब भाई-भाई अशा घोषणा देण्यात आल्या. अन्यायाविरोधात शांतता आणि संविधानप्रेमी सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत कट्टरतावादाला तोंड दिले पाहिजे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मॉब लिंचिंगच्या घटनांची गंभीर दखल घेत सरकारने याविरोधात कडक पावले उचलावीत, अल्पसंख्यांकासाठी संरक्षण कायदा व्हावा, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आदी मागण्या करत यासंदर्भात निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
तसेच घटनेला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करत यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षेची भावना निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. असे प्रकार यापुढे होऊ नये, म्हणून कडक कायदा करावा व अशा समाजकंटक लोकांना फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद करावी, त्याचबरोबर पीडितांना योग्य सरकारी मदत मिळावी, अशी मागणी मौलाना अन्वर नदवी यांनी केली.