अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्याहून कुटुंबासह नगरकडे परतत असताना जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. रेखा जरे या जातेगाव घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.
दुचाकीला धक्का लागल्याने झाला वाद -
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली. मिरर काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. याबाबत अधिक तपशील काढत असून एका हल्लेखोराचे छायाचित्र मिळाले असल्याचे ढुमे यांनी स्पष्ट केले.