अहमदनगर - शिर्डीत आता विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यामुळे आता बाहेर पडाल तर थेट रुग्णालयात जावे लागणार असाच संदेश या कारवाईतून पोलीस देत आहेत. संपूर्ण देशात प्रभावीपणे लॉकडाऊन चालू असताना काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिर्डी शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली.
विनाकारण बाहेर पडाल, तर जावे लागणार थेट रुग्णालयात - अहमदनगर लॉकडाऊन
आज शिर्डी शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली.
शिर्डीतील द्वारका सर्कलवर सकाळी दहा वाजेपासून शिर्डी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली, तर विना रुमाल आणि मास्क फिरणाऱ्या आणि सातत्याने विनाकारण फिरताना आढळून आलेल्या व्यक्तींना थेट रुग्णवाहिकेत टाकून साईबाबा सुपरस्पेशालिटी येथे नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. साधारणतः तीन तास सुरू असलेल्या कारवाईदरम्यान अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी लॉकडाऊनमधे विनाकारण फिरणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी सांगितले.