अहमदनगर- मराठी नववर्ष सुरू झाले, की ग्रामीण भागात यात्रा आणि जत्रांना सुरूवात होते. जिल्ह्यातील कोल्हार गावात विरभद्र देवाचा यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेमध्ये देवदेवतांची सोंगे यात्रेकरूंचे आकर्षण ठरत आहेत. राहुरी तालुक्यातील कोल्हार गाव पुर्वापार चालत आलेली ही सोंगांची प्रथा जपत आहे.
देवदेवतांची सोंगे घेत साजरा होतो कोल्हार येथील विरभद्र देवाचा यात्रोत्सव
जिल्ह्यातील कोल्हार गावात विरभद्र देवाचा यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेमध्ये देवदेवतांची सोंगे यात्रेकरूंचे आकर्षण ठरत आहेत.
पुर्वीच्या काळी पौराणीक कथा सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जात होत्या. कदाचित करमणुकीची साधने कमी असल्यामुळे ते सोंगे करत असतील. परंतु, तीच परंपरा आजही कोल्हार गाव जपत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गावाचे आराध्य दैवत असलेल्या विरभद्र देवाची यात्रा भरते. या यात्रेत देवदेवतांची सोंगे नाचवली जातात. रामायण, महाभारतातील कथा देवदेवीच्या सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जातात.
आजही गावातील लोक सोंगे नाचवण्याची परंपरा जपतात. सनई आणी संबळ या पारंपरिक वाद्यांवर नाचणारी देवांची सोंगे पाहण्यासाठी गावातील सर्व लोक येतात. कला आणि मनोरंजनाच्या माध्यमातून धार्मिक संस्कृती जपताना महाराष्ट्रात अनेक खेडी पहायला मिळतात.