अहमदनगर - पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या जामखेड मतदारसंघातील मोहा गावानजीक तब्बल ७ कला केंद्रांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत. त्यांनी शनिवारपासून प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
यापूर्वीही गावकऱ्यांनीकला केंद्राविरोधात विविध आंदोलने आणि ग्रामसभेत ठराव घेत ३ महिन्यांपूर्वी ही केंद्रे बंद पाडली होती. मात्र, आता प्रशासनाने यासर्व कलाकेंद्रांना पुन्हा परवानगी दिल्याने ग्रामस्थांनी शनिवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. सोमवारी तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. जामखेड तालुक्यामध्ये जामखेड शहर आणि आसपासच्या काही ठिकाणी अनेक कलाकेंद्रे प्रसिद्ध आहेत. राज्यभरातून अनेक शौकीन याठिकाणी भेट देत असतात. मात्र, एकूणच बाहेरची वर्दळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा वावर याठिकाणी वाढल्याने स्थानिक सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याने ग्रामस्थांचा या कलाकेंद्रांना विरोध आहे.
यापूर्वी परिसरातील मोहा, हापटेवाडी, रेडेवाडी, नागेवाडी आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी रास्तारोको, बंद या मार्गाने विरोध करत ३ महिन्यांपूर्वी मोहा गावातील सर्व कला केंद्रे बंद पाडण्यास जिल्हा प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र, गेल्या आठवड्यात ग्रामसभेचा विरोधाचा ठराव असताना जिल्हा प्रशासनाने तब्बल ७ केंद्रांना पुन्हा नूतनीकरणाचे परवाना दाखले दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मोहा ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे गावातील महादेव मंदिरासमोर अनेक महिला-पुरुष ग्रामस्थ गेल्या शनिवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत आहेत. मात्र, गेल्या ३ दिवसांत प्रशासनाने या आंदोलनाकडे लक्षही दिले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत, असाही आरोप नागरिक करत आहेत.