अहमदनगर- संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात सराफावर गोळीबार करत दरोडेखोरांनी लाखो रुपयांची चांदी लुटल्याची घटना बुधवारी (दि. 5 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सराफास सोडविण्यासाठी गेलेल्या अविनाश शर्मा या दुचाकी स्वाराची दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तर सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साई कृपा ज्वेलर्सचे मालक ज्ञानेश्वर चिंतामणी हे त्यांचे दुकान बंद करुन घराकडे चालले होते. संगमनेरच्या घुलेवाडी पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर गेले असता, त्यांना एक कार आडवी आली. त्यात चौघे बसले होते. त्यातील तिघांनी गाडीच्या खाली उतरून चिंतामणी यांच्या गाडीची काच फोडली. गाडीच्या काचा फुटल्यानंतर दरोडेखोरांनी सराफास दमदाटी सुरू केली. दरम्यान, गोळीबार व गाडीच्या फोडलेल्या काचेमुळे रस्त्यावर फार मोठा आवाज झाला. सराफ व चोरट्यांच्यात चालेल्या झटापटीमुळे अविनाश शर्मा व त्याचा मित्र दुचाकीवरून सराफाच्या जवळ आले. हा किरकोळ वाद नाही. तर, हे दरोडेखोर आहेत, ते सराफास लुटत आहेत हे लक्षात येताच त्यांनी हालचाल सुरू केली. तेवढ्यात दरोडेखोरांनी शर्मावर गोळीबार केला. यात शर्माच्या मांडीला गोळी लागली होती. दरम्यान, दरोडेखोरांनी सराफाकडील चांदीची पिशवी हिसकावून पळ काढला. तर, सराफ व शर्माच्या मित्राने जीव मुठीत धरत स्वत:चा बचाव केला. घटनास्थळावर गर्दी होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी नाशिकच्या दिशेने वाहनासह पळ काढला.