शिर्डी (अहमदनगर) -साई प्रसादालयाजवळील एका विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. सुरज मानिक जाधव (वय-15) असे मृताचे नाव आहे. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर या युवकाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले आहे.
शनिवारी दुपारी सुरज मानिक जाधव (वय-15) आणि त्याचाच सख्खा भाऊ विलास मानिक जाधव (वय 13) हे शिर्डीतील साईबाबा प्रसादालयाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या गोंदकर यांच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले. यातील सुरजने प्रथम विहिरीत उडी घेतली. त्यापाठोपाठ विलासनेही पाण्यात उडी घेतली. यात विलास स्वतःचा जीव वाचवत विहिरीतून वरती येण्यात यशस्वी झाला. मात्र, सुरज हा पाण्यात बुडाला.
सुरज पाण्यात बुडाला असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना समजताच पोलीस, शिर्डी नगरपंचायत आणि साई संस्थानचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, विहिर 50 फूट खोल आणि पूर्ण पाण्याने भरलेली असल्याने तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर सुरजचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मृत सुरज जाधव आणि विलास जाधव या दोन भाऊ शिर्डी बाजारतळ येथील आपल्या बहिणीकडे राहत असत. सुरुवातीला मिळेल ते काम करत. मात्र, नंतर छोट्या-छोट्या चोऱ्यांमध्ये यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात घरातील व्यक्तींनी जाऊन त्यांना पुन्हा शिर्डीत आणले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.