अहमदनगर -कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला होता. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केले आहे.
काय आहे प्रकरण?
इंदोरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कीर्तनात 'सम तिथीला स्त्रीसंग झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर यांना दिलासा देत खटला रद्द केला होता. या आदेशाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.