अहमदनगर- मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांबरोबर होते. मात्र पिचड यांनी आता पवारांची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे वाटत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पिचड विरोधकांची एकत्र मुठ बांधली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पिचड यांच्या विरोधकांच्या माध्यमातूनच त्यांना शह देण्याची तयारी सुरु केली आहे.
अकोले तालुका हा आदिवासी बहूल तालुका आहे. गेल्या काही वर्षांपासून पिचड यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करत येथील आमदारकी भूषविले. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी पिचड पिता-पुत्रांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे, पिचड यांच्या विरोधात नेहमी संघर्ष करणारे अशोक भांगरे आणि किरण लहमटेसह अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आता पिचड यांना लढा देण्यासाठी सर्व पिचड विरोधकांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.