अहमदनगर - दक्षिण अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या पुत्राने भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे. पण, मुलाच्या या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले आहे. गांधी पिता-पूत्र मिळून पक्षावर दबावतंत्र निर्माण करत असल्याचे बोलले जात आहे.
सुवेंद्र यांनी उमेदवारीवर दावा केला असाला, तरी दिलीप गांधींनी पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे दक्षिण अहमदनगरची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज आहेत. याबाबत त्यांना स्वतः उघड बंडाची भूमिका घेतली नसली तरी मुलाच्या आडून ते पक्षावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. तर त्याच ठिकाणी दिलीप गांधी यांनी मात्र याला आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आपण भाजपचेच काम करणार आहोत. उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि मुलाने असा निर्णय घेतला. पण, मी जनसंघापासून पक्षाचे काम करतो. मुलाची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढू, असे ते म्हणाले.
दरम्यान, दिलीप गांधींना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. बाहेरुन आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिलीप गांधींना प्रदेशाध्यक्षपद द्यावे अशी मागणी काहीजणांनी केली.
२००४ साली दिलीप गांधी केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांचे तिकीट कापून प्रा. ना. स. फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्यावेळीही गांधींनी पक्षाची भूमिका मान्य केली होती. त्यामुळे यावेळीही ते पक्षासोबतच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, मुलाची उमेदवारी पुढे करत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे सांगितले जात आहे.