शिर्डी -राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्नातील जेवणातून सुमारे 200 लोकांना विषबाधा झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. बाधित रुग्णांना तत्काळ उपचारासाठी राहुरी तालुक्यातील विवेकानंद नर्सिंग होम व राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, वृद्ध व महिलांची संख्या अधिक आहे. काही अत्यवस्थ वर्हाडींना लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या अन्नातून झाली? याबाबत माहिती मिळाली नाही. बाधितांची संख्या वाढल्याने अनेक वर्हाडी भयभीत झाले आहेत.
लग्नातील जेवणातून सुमारे 200 लोकांना विषबाधा; राहुरीच्या टाकळीमिया येथील घटना..
राहुरी तालुक्यात लग्नसोहळ्यातल्या जेवणातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. टाकळीमिया येथील सर्वांना उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम येथे तसेच काहीजणांना राहुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होममध्ये काही जणांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना लोणी येथील विखे पाटील दवाखान्यात हलविण्यात आल्याचे समजते.
उपचारासाठी दाखल झालेले 50 ते 60 जण असले तरीही या लग्नातून जेवण करून गेलेल्या बाहेरगावच्या पै-पाहुण्यांच्या आरोग्याची माहिती मिळाली नाही. मात्र, लग्नाच्या जेवणातूनच ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने बाहेरगावी गेलेल्यांही बाधा झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे बाधितांचा आकडा 200 ते 250 वर जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांची टाकळीमियाला भेट-
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्न समारंभात अन्नातून विष बाधा झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे हे त्यांच्या पथकासह रात्री आठ वाजता टाकळीमिया या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी माहिती घेवून आरोग्य यंत्रणेला सुचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्यासोबत अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. काकडे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. नागपूरकर यांच्यासह राहुरीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी टाकळीमियाँ प्राथमिक आरोग्य केंद्रासह राहुरी कारखाना येथील विवेकानंदन नर्सिंग होम या ठिकाणी भेट देवून सुरू असलेल्या उपचाराची माहिती दिली. तसेच घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. दरम्यान, आरोग्य खात्याने लग्न समारंभातील अन्नाचे नमुने घेतले असून अन्न व औषध प्रशासन विभाग देखील स्वतंत्रपणे नमुने घेणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.