अहमदनगर - सरकार आठ दिवसांत जाणार, दोन महिन्यात जाणार असे वारंवार सांगणाऱ्या विरोधीपक्ष भाजपाला पाच वर्षे असेच म्हणावे लागणार आहे. कारण महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्राकडून तुटपुंजी मदत मिळत असताना सीएसआर फंडाची मदत राज्यातील विरोधी पक्ष 75 हजार कोटी रुपये सांगत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमचे लक्ष कोरोना नियंत्रण आणि राज्याची आर्थिक घडी बसवणे यावर असून, भाजप या परिस्थितीत फक्त शब्दांचे राजकारण करत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेमडिसीवर औषधांचे 50 किट आणि सॅनिटर कॅन यांचे हस्तांतर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत हे औषध राज्यात अनेक जिल्ह्यात देण्यात येत आहे. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
भाजपला सत्तेची घाई
सरकारवर टीका करणे हे विरोधी पक्षांचे काम असते. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटकाळात शरद पवार यांनी मांडलेली भूमिका लक्षात न घेता केवळ शब्दांचे राजकारण करण्याची सवय लागलेली भाजप पवार साहेबांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडत आहे. आम्ही सर्व जाती, धर्म, पंथ यांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मात्र, राज्यातील अनेक भाजप नेत्यांना सत्तेची घाई झाली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. दोन महिन्यात येणार, आठ महिन्यात येणार असे म्हणत म्हणत पाच वर्षे भाजपची निघून जाणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिला.