शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात भारतीय पोशाखात मंदिरात येण्याचे भाविकांसाठी फलक लावत आवाहन करण्यात आले आहे. यावरुन संस्थानने तातडीने हे फलक हवावित, अशी मागमी तृप्ती देसाई यांनी केली. फलक न काढल्यास 10 डिसेंबरला येऊन हटवणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. याविरोधात शिर्डीतील सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ एकवटले आहे. दरम्यान, बाहेरच्या लोकांनी येऊन शिर्डीतील वातावरण गढूळ करू नये, असे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
देसाईंनी साई संस्थानला पाठवले पत्र
शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला आहे. मात्र, अद्याप हा बोर्ड हटवण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही 10 डिसेंबरला हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे.
देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा शिवसेना महिला आघाडीने दिला इशारा
दुसरीकडे शिर्डीतील ग्रामस्थांनी साई संस्थानने लावलेल्या आवाहन फलकाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तृप्ती देसाईंनी शिर्डीत येऊन फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास देसाईंच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला. याच बरोबरी साईसंस्थाने लावलेल्या फलकांना भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठींबा दर्शविला आहे.