अहमदनगर - कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आधार देत भाऊबीजेची भेट दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या महिलांनी बांधलेल्या राखीच्या बदल्यात कोपरगाव तालुक्यातील तब्बल 400 महिलांना स्वतःचे तीन महिन्याचे मानधन, असे प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील निराधार झालेल्या अनेक महिलांनी राखी पौर्णिमेला आमदार आशुतोष काळे यांना राखी बांधून मदतीचे आवाहन केले होते. निराधार महिलांनी बांधलेल्या धाग्याची जाणीव ठेवत आशुतोष काळे यांनी आज (दि. 2 नोव्हेंबर) दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या महिलांना भाऊबीजेची भेट दिली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात यांच्या उपस्थितीत 400 महिलांना आपल्या आमदारकीच्या मानधनातून प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.