अहमदनगर -राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नाही. आघाडी भक्कम आहे, एकत्र आहे आणि एकत्र काम करत आहे. काही लोक आघाडीत बिघाडी होण्याची वाट पाहात आहेत, असा टोला महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना लगावला आहे. संगमनेर तालुक्यातील शिपलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या अभियनाअंतर्गत बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, 'कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत घट ही वस्तुस्थिती आहे. मात्र आवश्यक तो खर्च करावाच लागत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा हप्ता देणे देखील बाकी आहे. त्यासाठीही राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. अडचणी असंख्य आहे. परंतु त्यातून मार्ग काढत आहोत.'
शिक्षण खात्याने गाडी खरेदीचा प्रस्ताव टाकला होता. काम करताना वाहनांची गरज भासत असते. परंतु गाडी खरेदीची बातमी अपुऱ्या माहितीच्या आधारे देण्यात आल्या. सहा गाड्यांचा प्रस्ताव असताना एकच गाडी मंजूर झाली. परंतु त्याविषयीच्या बातम्या मात्र जास्त चालल्या, असा उपरोधिक टोला महसूलमंत्री थोरात यांनी लगावला आहे.