महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेटत्या 'कठा' यात्रेचा थरार, लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी

पेटत्या कठा यात्रेचा थरार, लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी लावली होती.

By

Published : May 19, 2019, 1:59 PM IST

पेटत्या कठा घेऊन जाताना भाविक

अहमदनगर- जिल्हयातील अकोले तालुक्यातील कौठेवाडी हे एक आदिवासी गाव आहे. रात्री विरभद्राच्या मंदिरात अविरतपणे घंटानाद सुरु होतो. देवाच्या नामाचा जयघोष. संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असे लयबद्ध होणारा भाविकांचा चित्कार. बिरोबाचा गजर करत मंदिराला प्रदक्षिणा मारत भाविक नवसपूर्ती करतात.

अंधारात दिसणारा हा थरार भाविकांना स्तब्ध करतो. तर कठा डोक्यावर घेतलेले भाविक उघड्या अंगावर ओघळणारे तप्त तेल, पडणारे निखारे, अनवाणी पायांना बसणारे चटके विनासायस सहन करतात. बिरोबाचा नामोगजर केल्याने हे सर्व सहज शक्य होते, असे नवसपूर्ती झालेले भाविक सांगतात. अक्षयतृतीये नंतर येणाऱ्या रविवारी (12 मे) डोंगरकड्यात बसलेल्या या गावात रात्री ही यात्रा भरली होती.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कौठवाडीया गावात ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग अशा ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड या घागरीत उभी भरतात. त्यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने त्याला सजवले जाते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हेच पेटलेले कठे ( घागर ) डोक्यावर घेवून धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणिक किलो-किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत असते. मात्र, लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एकाही भाविकाला जखम होत नाही.


नवसपूर्ती झाल्यानंतर श्रद्धाळू आदिवासी भाविक कठा घेवून येतात. दरवर्षी यात्रेत ४० ते ५० कठे असतात. एकाचवेळी ते पेटवले जातात. परिसरातील भक्तगण ज्यावेळी हे कठे डोक्यावर घेवून मिरवतात. त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भूत दृश्य दिसू लागते. हा थरार अनुभवण्यासाठी राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. कठ्याची ही परंपरा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली, याबद्दल कुणालाही सांगता येत नाही. याला श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा मात्र पूर्वापार चालत आलेली ही परंपरा या आदिवासी बांधवांनी आजही अखंडीत ठेवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details