अहमदनगर :राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडत आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरोधात महाविकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे. आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणूकीत एकूण 550 मतदार आहे. यातील 400 मतदार मविआकडे आहे, त्यामुळे दडपशाहीचे राजकारण सत्ताधारींकडून सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मनमाड शहराध्यक्ष दिपक गोगड यांनी केला आहे.
साईबाबांचे दर्शन घेऊन मनमाडकडे रवाना : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवडणुक पार पडत आहे. त्यामुळे मविआचे काही उमेदवार आणि मविआकडे असलेले 400 मतदारांना घेवुन आम्ही शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. शिर्डीतील 3जी हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलो आहे. सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन मनमाडकडे रवाना होणार आहे. आमचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र आम्ही शिर्डीत मुक्कामी असल्याचे सत्ताधाऱ्यांना समजल्यानंतर पोलिस बळाचा वापर करत आम्हाला घेवून जाण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला आहे. मनमाडमध्ये 4 मतदान केंद्रे आहेत. या गोंधळानंतर पोलिसांचा हॉटेलमधून काढता पाय घेतला.