अहमदनगर- दरवर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय 'स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. 'थिंक ग्लोबल फाऊंडेशन'च्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हा पुरस्कार अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून मकरंद अनासपुरे यांना रु. ५१०००, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी पासून फाऊंडेशनने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार अधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गायकवाड आणि सोळंकी या दोन सनदी अधिकाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हेही वाचा -...म्हणून 'दोन स्पेशल' कार्यक्रमात सचिन पिळगावकरांना अश्रु अनावर
आजवर या पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अनासपुरे यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कुणाचाही वरदहस्त नसताना त्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. 'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांचे आधारवड म्हणून उभे राहिले. अनासपुरेंची ही सामाजिक संवेदनशीलता दखलपात्र आहे. त्यामुळेच त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.