शिर्डी - कोरोनाचे संकट कायमचे टळू दे व लवकर मंदिर उघडून तुझ्या चरणांचे दर्शन होवू दे, असे साकडे घालत गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर शेकडो भाविकांनी साई मंदिर कळसाच्या दर्शनावर समाधान मानले. तसेच स्थानिक तरुण कारागिरांनी निर्माण केलेला लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरला.
गुरूवारी पहाटे द्वारकामाईत सुरू करण्यात आलेल्या अखंड साईसच्चरित्र पारायण सोहळ्याची आज पहाटे काकड आरतीनंतर सांगता झाली. या निमित्ताने साईप्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तथा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें.यर्लगड्डा यांनी पोथी, सीईओ कान्हूराज बगाटे यांनी विणा तर डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी साईंची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मालदीया यर्लगड्डा, संगिता बगाटे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, सरंक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी आदी उपस्थित होते. तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें.यर्लगड्डा व मालदीया यर्लगड्डा यांच्या हस्ते सकाळी साईंची पाद्यपुजा करण्यात आली. तसेच समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला.