अहमदनगर- गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. एके काळी शहरात रेशनवर पाणी वाटप केले जात असे, असे सांगीतले जाते. मात्र, या वर्षी उन्हाचा पारा आणि निवडणुकीतील प्रचारांचे मुद्दे तापत असताना आता पाणी प्रश्नावरुन वातावरण ढवळून निघत आहे.
रणधुमाळी लोकसभेची ! ..पाणी नाही तर मतदान नाही; कोपरगावरांचा इशारा - Ahamadnagar
गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. एके काळी शहरात रेशनवर पाणी वाटप केले जात असे, असे सांगीतले जाते. मात्र, या वर्षी उन्हाचा पारा आणि निवडणुकीतील प्रचारांचे मुद्दे तापत असताना आता पाणी प्रश्नावरुन वातावरण ढवळून निघत आहे.
शहराला गोदावरीच्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी शहरापासून १० किलोमीटर अंतरावरवर ४ तलाव आहेत. पाचव्या तलावाचे काम प्रस्तावित आहे. त्यातच उन्हाळ्यात कालव्याचे आवर्तन लांबल्याने दर १३ दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यातही अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच स्तरांतील नागरीक आता एकवटले आहेत.
शहरातील महिला, पुरुष बांधव तसेच जैन समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यात कोपरगाव शहराच्या ५ व्या तळ्याचे काम तातडीने सुरु करावे, तसेच ३ तळ्यांतील गाळ काढण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. २५ तारखेपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अन्यथा मतदानावर बहीष्कार टाकण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.