अहमदनगर: नैसर्गिक आपत्ती आणि राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे आणि विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. अखेर जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. याकरिता अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
'या' संघटनांचा समावेश: अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.
शेतजमिनी हडपण्याचे काम सुरू:राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्धस्त झाली. सरकारने या पिकांना नुकसान भरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. प्रत्यक्षात जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा राबविल्या गेल्या. जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी, रस्ते, कॉरीडोर, विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी हडप केल्या जात असल्याची खंत डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.
'या' समस्यांच्या विरोधात मोर्चा:कोविड संकटात १७ रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेले दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले आहेत. अशातच पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जगणे कठीण केले आहे. या पार्श्वभूमीवर दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध, जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन यासह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.
हेही वाचा:Punjab CM After Amritpal Arrest : अमृतपालच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, रात्रभर झोप लागली नाही....