अहमदनगर - शेती आणि ग्रामीण विकासाची केवळ भाषा करायची मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करायची नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण भागासाठी बोलाचा भात बोलाची कढी असाच आहे, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिली.
'अर्थसंकल्प म्हणजे शेतीसाठी केवळ बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात'
अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर केली जात असताना जाहीरनाम्यात आश्वासन दिले गेले असतानाही शेतकरी पेन्शन बाबत मात्र नकारघंटा वाजवण्यात आली, अशी माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी दिली.
अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्यामुळे शेतीमालाचा उत्पादन खर्च आणखी वाढणार आहे. शेतीमालाच्या आधार भावात अत्यंत तुटपुंजी वाढ करुन सरकारने अगोदरच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला होता. आता आधार भावात शेतीमाल खरेदी करण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद न केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर केली जात असताना जाहीरनाम्यात आश्वासन दिले गेले असतानाही शेतकरी पेन्शन बाबत मात्र नकारघंटा वाजवण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे बोलले जात असताना सिंचन, रोजगार, ग्रामीण आरोग्य, विमा, गोदामे आणि बाजार सुधारणा याबाबत मात्र, पुरेशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही, अशी माहिती नवले यांनी दिली.