शिर्डी -गुरूपोर्णिमा उत्सवाला साईनगरीत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.
काकड आरतीने उत्सवाला सुरुवात -
आज पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आले आहे. त्यानंतर उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5 वाजता साईंच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी विणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी, तर मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी साईंची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी प्रथम अध्याय, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी द्वितीय अध्याय, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी तृतीय अध्याय, कार्यकारी अभियंता संजय जोरी यांनी चौथा अध्याय व संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.