अहमदनगर ( शिर्डी ) :देश विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2017 ला शिर्डी विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना रात्रीच्यावेळी देखील विमानाने पोहचणे शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर आज 8 एप्रिलपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
साईंच्या काकड आरतीसाठी पोहोचता येणार भाविकांना : साईबाबांच्या मंदिरात पहाटे होणाऱ्या काकड आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती राहतात. मात्र अनेक भाविकांना वेळेवर पोहचताच येत नाही. याशिवाय काकड आरतीसाठी एक दिवस आधीच शिर्डीत यावे लागते. मात्र या नाईट लँडिंगमुळे भाविकांना आता पहाटे शिर्डीत येता येणार आहे. शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून हैदराबाद, चैन्नई, दिल्लीसह बंगलोर इथून येणाऱ्या विमानांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विकासालाही अधिक चालना मिळणार हे मात्र नक्की आहे.