अहमदनगर -माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नगर मार्गे पुण्याला जाताना अचानक राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आपल्या मागण्यांच्या बाबतीत ठाम असल्याचेच दिसून आले. यावेळी खासदार सुजय विखेही उपस्थित होते.
जानेवारी अखेर दिल्लीत करणार आंदोलन -
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आजपर्यंत भाजपासाठी संकटमोचन म्हणून भूमिका पार पाडली. भाजपा सत्तेत असताना त्यांनी अनेक गंभीर, नाजूक प्रश्नांत शिष्टाई करत मार्ग काढले. 2018 आणि 2019 मधील राळेगणसिद्धी येथील अण्णा हजारेंच्या आंदोलनात महाजन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत अण्णांचे मन वळवण्यात यश मिळवले होते. मात्र, आश्वासन देऊनही केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे अण्णांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार केंद्रातील भाजप सरकार विरोधात उपसले आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अण्णांची पुन्हा एकदा राळेगणसिद्धीमध्ये जाऊन भेट घेतली. अण्णांच्या मागण्यांवर एक उच्चस्तरीय समिती नेमून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महाजन यांनी भेटीनंतर सांगितले असले, तरी अण्णा आपल्या मागण्यांवर ठाम असून जानेवारी अखेर दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे लोकशाहीवर निर्घृण हल्ला करतात- संजय राऊत