अहमदनगर - शिर्डीचे साईबाबा मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, शिर्डी ग्रामस्थांना पूर्वी प्रमाणे सहज साई दर्शनासाठी जाता येत नाही. तर, दुसरीकडे मंदिर परिसरातील गेट नंबर ३ आणि ४ भक्तांसाठी खुले नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे, शिर्डी ग्रामस्थांनी येत्या 29 तारखे पर्यंत निर्णय न घेतल्यास शिर्डी बंद ठेवण्याची तयारी केली होती. यावर साई संस्थानने ग्रामस्थांशी चर्चा करून आजपासून साईबाबांचा पालखी सोहळा आणि मंदिर परिसरातून भक्तांना बाहेर निघण्यासाठीचे द्वार खुले केले. त्यामुळे, ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय मागे घेतला.
माहिती देताना शिर्डी ग्रामस्थ हेही वाचा -अण्णांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती; आंदोलन होणार नाही, महाजनांना विश्वास
हनुमान मंदिर आणि चावडी मंदिरही दर्शनासाठी खुले
शिर्डीकरांना सुलभ दर्शन आणि साई भक्तांना मंदिर परिसरातील तीन आणि चार नंबर द्वारने बाहेर सोडण्याची मागणी शिर्डीकरांनी केली होती. त्यास साई संस्थानने प्रतिसाद न दिल्याने अखेर ग्रामस्थांनी येत्या 30 तारखेला शिर्डीत बंद पुकारला होता. त्यानंतर साई संस्थान प्रशासनाने एक पाऊल पुढे येत काल रात्री शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांबरोबर बैठक घेतली व आजपासून साईबाबांचे मुख्य दर्शन आणि 3 नंबर गेटमधून भक्तांना बाहेर सोडणार असल्याचे, तसेच हनुमान मंदिर आणि चावडी मंदिरही भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय जाहीर केला.
साईबाबांची पालखीही आजपासून सुरू
तसेच, दर गुरुवारी निघणारी साईबाबांची पालखीही आजपासून सुरू होणार आहे. शिर्डी ग्रामस्थांना पालखी गेटमधून साईबाबांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी जाता येणार असल्याचा निर्णय साई संस्थानने घेतला असल्याने, शिर्डी ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
हेही वाचा -परमिटरुममध्ये बाटल्यांऐवजी इंजेक्शन ठेवण्याची वेळ - विखे पाटील