अहमदनगर- शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने (उद्या) सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर या काळात १०१ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे सोमवारी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याची, माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबांनी १०० वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे विजयादशमी म्हणजे साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी शिर्डीत येतात. दि. ०७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात १०१ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हेही वाचा - राधाकृष्ण विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध
उत्सवाच्या प्रथम दिवशी सोमवार दि. ०७ ऑक्टोबरला पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५ वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्री १०.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
हेही वाचा - राधाकृष्ण विखे-पाटलांची उमेदवारी अडचणीत; अर्जावर काँग्रेस उमेदवाराचा आक्षेप
मंगळवार, दिनांक ०८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९ वाजता भीक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिराच्या समोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५ वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत श्रींच्या समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.
हेही वाचा - तिकीट नाकारणे हा पार्लमेंट्री बोर्डाचा निर्णय, कदाचित नवी जबाबदारी देणार- गिरीश महाजन
बुधवार, दिनांक ०९ ऑक्टोबर उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्री १०.३० वाजता शेजारती होईल. उत्सवाच्या सांगता दिवशी गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होईल. सकाळी १० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्री १०.३० वाजता शेजारती होईल आणि उत्सवाची सांगता होईल.