अहमदनगर- राहाता तालुक्यातील लोणी येथे गोळीबार करून श्रीरामपूर येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय-24 वर्षे), संतोष सुरेश कांबळे (वय-28 वर्षे), गाठण उर्फ शाहरुख उस्मान शहा (वय-20 वर्षे, तीघे रा. बीफ मार्केट जवळ, वार्ड क्र. 2, श्रीरामपूर), अरुण भास्कर चौधरी (वय-23 वर्षे, रा. सोनगाव रोड, खंडोबा मंदीर जवळ, लोणी प्रवरा, ता. राहाता) यांचा समावेश आहे.
फरदीन अबू कुरेशी (वय 18) याला आरोपी सिराज शेख, संतोष कांबळे, शाहरुख शहा यांनी जबरदस्तीने धमकी देऊन त्याला प्रथम नाशिक येथे नेले. त्यानंतर लोणी येथे आणून सोबत असलेले उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम (सर्व रा. लोणी, ता. राहाता) यांनी मिळून जुन्या वादाचे कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यात फरदीन अबू कुरेशी याची हत्या केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, आण्णा पवार, शंकर चौधरी, रवींद्र कर्डीले, विजय वेठेकर आदींच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला व पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून चौघांना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा - अहमदनगर: हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू