अहमदनगर - कुकडी कालव्यातून उन्हाळी अवर्तनाचे १० मे रोजी सुटणारे पाणी अद्याप सुटले नसल्याच्या निषेधार्थ माजी मंत्री राम शिंदे यांनी आजपासून कर्जत येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. याबाबत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला असून सतत फेसबुक-ट्विटरवर असणारे आमदारांनी यातून का मार्ग काढला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कुकडीच्या उन्हाळी अवर्तनासाठी माजी मंत्री राम शिंदे यांचे उपोषण
जोपर्यंत कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा राम शिंदे यांनी दिला आहे.
कर्जत, जामखेड, पारनेर आणि करमाळा(जि. सोलापूर) या तालुक्यातील शेतीसाठी हे आवर्तन होते. मात्र, उन्हाळा संपत आलेला असताना येडगाव धरणात पाणी नसल्याचे आता कारण पाटबंधारे विभाग देत आहे. मात्र, यामुळे या तालुक्यातील शेती कुकडीच्या पाण्याअभावी नष्ट होत असताना विद्यमान लोकप्रतिनिधी यावर काहीही प्रयत्न करत नाहीत, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. जोपर्यंत कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा राम शिंदे यांनी दिला आहे.