अहमदनगर - जिल्ह्यात भर चौकात एका युवकावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अहमदनगरमध्ये भर चौकात युवकावर गोळीबार, आरोपी फरार - घटनास्थळी दाखल झाले
अहमदनगर जिल्ह्यात भर चौकात एका युवकावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घोडेगाव येथील युवक सचिन गोरख कुऱ्हाडे (२५) हा पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या एकाने सचिनवर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या खाद्याला लागली. तर दुसरी गोळी जवळून गेली. या घटनेनंतर जखमी सचिनला नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हा गोळीबार जुन्या वादातून झाला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सोनई पोलिसांना माहिती मिळताच सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्धन सोनवणे आपल्या सहकाऱ्यांसोबत पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सदर गोळीबार करणारे अज्ञात आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.