महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुळा नदी दुथडी भरून लागली वाहू, शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात केले जलपूजन

मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळाचा सामना करणाऱया तांगडी, आंबी-खालसा घारगाव, अकलापूर, साकूर, मांडवे बु, जांबूत या गावांना मोठा आधार मिळणार आहे. पाणी टंचाई दूर होणार म्हणून शेतकऱ्यांनी ढोल ताश्याच्या गजरात जलपूजन केले.

मुळा नदी

By

Published : Jul 7, 2019, 12:23 PM IST

अहमदनगर- मान्सूनच्या पावसाने जोर धरल्याने अकोले तालुक्यात उगम पावणारी मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुळा नदी तुडुंब भरून वाहू लागल्याने नदी काठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शेतकरी वर्गामध्ये यामुळे समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात नदीच्या पाण्याचे पूजन केले. मुळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने संगमनेर तालुक्यातील घारगाव, अकलापूर, साकूर परिसराला वरदान ठरणार आहे.

दुथडी भरून वाहत असलेली मुळा नदी

अकोले तालुक्यात सध्या जोरदार मोसमी पाऊस पडत आहे. यामुळे भागातील पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण पूर्णक्षमतेने शनिवारी दुपारी बाराच्या दरम्यान भरले. धरण भरल्यानंतर सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने मुळा नदी दुभडी भरून वाहू लागली आहे. नदीचे पाणी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आले. या मुळे शेतकरी वर्गाच्या आनंदाला उधाण आले.

रविवारी सकाळी या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने ४ हजार २३० क्युसेक वेगाने मुळा वाहत होती. त्यामुळे तांगडी, आंबी-खालसा घारगाव, अकलापूर, साकूर, मांडवे बु, जांबूत परिसरात नदी दुथडी भरून वाहू लागली. अनेक महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या या नदीकाठच्या गावांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे.

पाणी टंचाईचे संकट यामुळे दूर होणार असल्याने या नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी ढोलताश्याच्या गजरात आनंद व्यक्त करत पाणीपूजन केले. पठार भागातही सर्वदूर हा मोसमी पाऊस पडत असल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळणार आहे. रविवारी दुपारपर्यंत मुळा नदीचे पाणी राहुरी तालुक्यातील मुळा धरणात दाखल होईल असा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details