अहमदनगर - वारंवार तगादा लावूनही दूध डेअरी मालकाने दुधाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नितीन शिंदे (वय २८, रा. रहीमपूर, ता. संगमनेर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नितीन शिंदे हे दूध उत्पादक शेतकरी असून, ते संकलित दूध धांदरफळ येथील श्रमिक मिल्क अॅन्ड फूड प्रोसेससी डेअरीला घालत होते. नितीन व काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दूध संघाकडून बिलापोटी सुमारे ४ लाख २८ हजार रुपये येणे बाकी होते. आपले तसेच इतर शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्यासाठी नितीनने डेअरी मालकाकडे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. परंतू, डेअरी मालकाने दूध बिलाचे पैसे देण्यास नकार दिला. यावेळी नितीनने डेअरी मालकाला आपण विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे फोनवरून सांगितले. यावेळी तू माझ्या दुध संघासमोर येऊन विष पिलास तरी मला काही फरक पडणार नाही, असे डेअरी मालक म्हणाला. हे संभाषण नितीनच्या फोनवर रेकॉर्ड झाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.