महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीतील 'त्या' नेत्याची दादागिरी भविष्यात खपवून घेणार नाही - माजी महापौर कळमकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजीचे दर्शन शनिवारी झाले. माजी महापौर आणि नगर शहरातून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार असलेल्या अभिषेक कळमकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार झाला. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

माजी महापौर अभिषेक कळमकर

By

Published : Sep 22, 2019, 9:56 PM IST

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यानंतर शहरातील पक्षांतर्गत संघर्ष उफाळून येत माजी महापौर आणि नगर शहरातून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार असलेल्या अभिषेक कळमकर यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकार झाला. यावेळी राष्ट्रवादीतील 2 गटात बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे. कळमकर यांच्यावर चप्पलफेक करणारे कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

बोलताना माजी महापौर अभिषेक कळमकर

या प्रकाराने संतप्त झालेल्या कळमकर यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्षातील जेष्ठ नेत्यांनी कळमकर यांची समजूत काढली. कळमकर यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाला मान देत शनिवारी तक्रार दिली नसली तरी आज रविवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेत, काल झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगतानाच भविष्यात मात्र ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - कोपरगावमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग


कळमकर कुटुंब हे नेहमीच शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आहे. माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि आम्ही नेहमीच पक्षाच्या चौकटीत राहून काम केले आहे, असे अभिषेक कळमकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वरिष्ठ नेत्यांना शनिवारी झालेला प्रकार सांगितला आहे. भविष्यात माझ्यावर किंवा इतर कुणाही कार्यकर्त्यांवर असा गुंडगिरी करण्याचा प्रकार झाल्यास आपण संबंधितांविरोधात ठामपणे उभे राहू असे ते म्हणाले.

हेही वाचा - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेनेला गळती सुरु


दरम्यान कळमकर यांनी आपली तक्रार मागे घेतली असली तरी कोतवाली पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात अभिषेक कळमकर यांच्यासह दोन्ही गटातले कार्यकर्ते आहेत.

हेही वाचा -महाराजांच्या तलवारी चमकल्या तिथे राज्य सरकार छमछमचा आवाज करणार - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details